जुन्नर (वृत्तसंस्था) – पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटर भिंतीशेजारील खड्यात भरधाव वेगाने जाणारी फॉर्च्युनर गाडी कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.१९) रात्री उशिरा झाला असून नगर-कल्याण मार्गावरील खुबी फाट्याहुन खिरेश्वरकडे जाणाऱ्या या वाहनात पाच जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जागांची खरेदी-विक्री करणारे सत्यवान उर्फ धर्मा मच्छिन्द्र पानसरे (रा. घाटघर, रा. जुन्नर) आणि घाटकोपर येथील उत्तम मारुती घोडेकर यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माळशेज चेक पोस्टवर सदर फॉर्च्युनर (एमएच ०४- जीएम २०१) न थांबताच पुढे गेली व आडवाटेने पळ काढण्याच्या घाईत हा अपघात झाला असावा, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. सदर वाहनाची नोंद नवनाथ सि. अभंग, ठाणे यांच्या नावावर असून मृत व्यक्तींना उत्तरीय तपासणीसाठी ओतूर रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान माळशेज घाट परिसरात अनेक बेनामी जमिनी असून याबाबतचे बनावट दस्तावेज बनवून त्यांची खरेदी-विक्री करणारी टोळी जुन्नर व परिसरात सक्रिय असल्याचे बोलले जाते. या मध्ये विविध खात्यांचे अधिकारी, जमिनीचे एजंट तसेच काही तालुक्यातील काही बडे प्रस्थ गुंतल्याची चर्चा आहे.
मंगळवारी (दि. १९) एका जागेच्या संदर्भात पानसरे व त्याचे सहकारी मढ परिसरात गेले होते. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या कुसुर गावांत शिक्षण घेतलेल्या या युवकाचा अतिसामान्य ते आलिशान जीवनशैलीपर्यंतचा प्रवास एखाद्या चित्रपटातील कथेसारखा होता.







