अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) : वन क्षेत्रात अनधिकृतपणे बकऱ्या चरणाऱ्या दोघांनी वनमजुराला मारहाण केल्याची घटना तालुक्यात जानवे भागात घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जानवे-महिंदळे भागात वनविभागाने नवीन झाडे लावली आहे. गुरुवारी दि. २७ रोजी कायम वनमजूर म्हणून कार्यरत असलेले पुंजू वेडू निकम हे गस्त घालीत होते. तेथे अमोल सुनील भील (रा. जानवे) हा बकऱ्या चारत होता. त्यास निकम यांनी सांगितले की, ही जागा वनविभागाची असून येथे बकऱ्या चारू नको, बकऱ्या काढून घे. मात्र त्याचा राग आल्याने अमोल याने जंगल काय तुझ्या बापाचा आहे का असे बोलून शिवीगाळ करून दगड मारून फेकला. तसेच त्याचा भाऊ बापू सुनील भील याला बोलवून घेतले. वनमजूर निकम हे वनपाल प्रेमराज सोनवणे यांच्याशी फोनवर बोलत असताना बापू भील याने काठी घेवून निकम यांच्या डाव्या डोळ्याच्या खाली मारल्याने दुखापत झाल्याने रक्त वाहू लागले.
तसेच अमोल याने देखील चापटा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी समाधान पाटील याने निकम यांची सोडवणूक करत जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर निकम यांनी अमळनेर पोलिसांत तक्रार दिली असून दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ कैलास शिंदे हे करीत आहेत.