पॅरिस (वृत्तसंस्था ) ;- युरोपियन स्पेस एजन्सीने (ईएसए) आपल्या ‘कोपर्निकस सेंटिनेल-२’ उपग्रहावरून घेतलेले रामसेतूचे छायाचित्र शेअर केले आहे. हा पूल भारत आणि श्रीलंका यांना जोडणाऱ्या बेट साखळीचा एक भाग आहे.
रामसेतू श्रीलंकेतील मन्नार बेटाला जोडणारा तसेच भारताच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यापासून दूर असलेल्या रामेश्वरम बेटाच्या दरम्यान ४८ किलोमीटर पसरलेला असून हा सेतू मन्नारचे आखात (दक्षिण), हिंदी महासागराचे प्रवेशद्वार, पाल्क सामुद्रधुनी (उत्तर), बंगालच्या उपसागराच्या प्रवेशद्वारांना वेगळे करत असल्याचे भूगर्भशास्त्र संशोधकांचे मत आहे. रामसेतूच्या बांधकामाबाबत अनेक सिद्धांत असले, तरी भूगर्भशास्त्रीय पुराव्यावरून असे सूचित होते की, हे चुनखडीचे तटबंध हे त्या भूमीचे अवशेष आहेत, ज्याने एकेकाळी भारताला श्रीलंकेशी जोडले होते. युरोपियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे की, हा रामसेतू पंधराव्या शतकापर्यंत जाण्या-येण्यायोग्य होता,
त्यानंतर वर्षानुवर्षे वादळांमुळे तो हळूहळू नष्ट होत गेला. येथील काही वाळूचे ढिगारे कोरडे असल्याची नोंद आहे, तर येथील समुद्र अतिशय उथळ असून त्याची खोली केवळ १ ते १० मीटरपर्यंत आहे. या भागातील पाण्याच्या हलक्या रंगानेही ते दिसून येते. मन्नार बेट अंदाजे १३० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले असून श्रीलंकेच्या मुख्य भूमीशी रस्ते पूल तसेच रेल्वे पुलाने जोडलेले आहे
. हे दोन्ही बेटाच्या दक्षिणेकडील टोकाला दिसतात. भारताच्या बाजूने रामेश्वरम बेटावर दोन किलोमीटर लांबीच्या पांबन ब्रिजवरूनही तेथे पोहोचता येते. पांबन आणि रामेश्वरम ही येथील दोन प्रमुख शहरे आहेत. पांबन आणि रामेश्वरममधील अंतर अंदाजे १० किलोमीटर आहे. रामसेतूचे दोन्ही विभाग आपापल्या देशांतील संरक्षित राष्ट्रीय उद्यानांचा भाग आहेत. वाळूचे ढिगारे तपकिरी नोडीसारख्या पक्ष्यांच्या प्रजननासाठी मैदानाच्या स्वरूपात काम करतात, तर माशांच्या आणि सीग्रासच्या अनेक प्रजाती या भागातील उथळ पाण्यात वाढत असल्याचेही युरोपियन स्पेस एजन्सीने सांगितले.