चाळीसगाव- धुळे महामार्गावरील भोरस शिवारातील घटना
चाळीसगाव ;- भरधाव ट्रकने दुचाकीने जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिल्याने दोन जिगरी मित्र ठार झाल्याची दुर्दैवी घटना मेहुणबारे चाळीसगाव- धुळे महामार्गावरील भोरस शिवारात घटना घडली.
चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील विलास छगन बागूल (वय ४४) व अंकुश काशिनाथ गायकवाड (वय ३५) या दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, विलास बागुल हा मित्राला घेऊन तळोंदे प्र. चा. सांगवी (ता. चाळीसगाव) येथे सासरवाडीला जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. यावेळी भोरस गायरान शिवाराजवळ त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरात होती, की दुचाकीवरील विलास बागूल व अंकुश गायकवाड हे दूरवर फेकले जाऊन यांना जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक पसार झाला . याप्रकरणी मुरलीधर बागूल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. तापास हवालदार विजय शिंदे करीत आहेत.