कर्मचाऱ्यांसह डॉक्टरही वैतागले : जळगावात हजारावर प्रकरणे प्रलंबित !
जळगाव (प्रतिनिधी) : भारत सरकारची दिव्यांगांसाठी असणारी वेबसाईट ‘स्वावलंबन कार्ड डॉट कॉम’ हि सुरळीत चालत नसल्याने दिव्यांग बांधवांचे हाल सुरु आहेत. त्यामुळे शासकीय पातळीवरदेखील कर्मचारी, तपासणी करणारे डॉक्टरही वैतागले असून कामकाज नियमित होत नाही. जळगाव जिल्ह्यातील हजारो प्रकरणे प्रलंबित पडलेली आहे.
दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात सध्या जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अशा दोघींकडे प्रक्रिया सुरु आहे. भारत सरकारची दिव्यांगांसाठी असणारी वेबसाईट ‘स्वावलंबन कार्ड डॉट कॉम’ यावरून दिव्यांग बांधवांना ऑनलाईन अर्ज भरणे, जुने प्रमाणपत्र नूतनीकरण करणे तसेच अर्जाची कार्यवाही कुठवर आली ते पाहता येते. तसेच, प्रमाणपत्र तयार झाले असेल तर ते डाऊनलोड करून प्रिंटही काढता येते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हि वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याच वेबसाईटवरून तपासणी झालेल्या दिव्यांगांची माहिती डॉक्टरांना अपलोड करावी लागते. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारीदेखील प्रमाणपत्र कार्यवाहीवर देखरेख करीत असतात. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक अशा दोघींकडे हजारावर प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील दिव्यांग बांधवाना सध्या “वेट अँड वॉच” च्या भूमिकेत राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांना रेल्वे व बस सवलतीचेही अर्ज सादर करतां येणे दुरापास्त झाले आहे. भारत सरकारच्या पातळीवर हि वेबसाईट लवकरात लवकर पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरु झाली पाहिजे अशी मागणी दिव्यांग बांधवांकडून केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनीही लक्ष घालावे असेही दिव्यांग संघर्ष संघटनेचे गणेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
“दिव्यांग बांधवांची प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाहीचे सर्व कामकाज हे एकाच वेबसाईटवरून होते. गेल्या दोन महिन्यांपासून साईट मधेच बंद पडत असल्याने कामकाजात अडथळा येत आहे. दिव्यांग बांधव रोजच विचारतात, मात्र त्यांची समजूत घालताना दमछाक होते. केंद्र शासनाने वेबसाईट लवकर सुरळीत करावी. ”
– डॉ. मारोती पोटे, अध्यक्ष, दिव्यांग बोर्ड, जीएमसी, जळगाव.