फैजपूर पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : फैजपूर परिसरातून डीजेच्या वाहनातील ऍम्प्लिफायर, वायर, मिक्सर व इतर साहित्य असे चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना फैजपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
सिताराम बदा भिलाला (वय २२, रा. सांगवी शिवार, ता. यावल, मूळ दवाटीया बुजुर्ग ता. बोरी, जि. बुऱ्हानपूर, म.प्र.) आणि राजू मोहन भिलाला (वय १९, रा. खिरोदा ता.रावेर,मूळ धुपी तितराणा ता. बिस्टान जि. खरगोन मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. दि. १३ मे दरम्यान फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील न्हावी या गावी जुना सरकारी दवाखाना परिसरात मारुळ रोडवर मोकळया जागेत उभ्या असलेल्या डीजेच्या वाहनातील सुमारे ८३ हजार रुपये किमतीचे साहीत्य चोरी झाले होते. या चोरी प्रकरणी विक्रम वामन तायडे यांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द फैजपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास न्हावी बीटचे सहाय्यक फौजदार देविदास सुरदास करत होते. तपासा दरम्यान दोघा चोरट्यांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. सपोनी निलेश वाघ यांच्या मार्गद्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दिन सय्यद, बबन पाटोळे, देविदास सूरदास, पोहेका राजेंद्र बऱ्हाटे, महेंद्र महाजन, विकास सोनवणे आदींनी ही कारवाई केली.