शहरातील श्रीकृष्ण कॉलनीत पडला सशस्त्र दरोडा
चोपडा (प्रतिनिधी) : येथील श्रीकृष्ण कॉलनीत मंगळवारी दि. २८ मे रोजी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पोलिसांनी फिल्मीस्टाईल पाठलाग केला. त्यात दोघांना पकडण्यात यश आले. तर तिघे फरार होण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या दोघांना ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या दरोड्यात ९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
चोपडा शहरातील जुना शिरपूर रस्त्यावरील श्रीकृष्ण कॉलनी भागातील नवल ओंकार पाटील यांच्या राहत्या घरी मंगळवारी दि. २८ मे रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनात पाच दरोडेखोर आले. त्यांनी घराच्या कंपाउंडचे व दरवाज्याचे कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. पाच दरोडेखोरांपैकी दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून नवल पाटील यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली दरोडा टाकला. ९ हजार ५०० रुपये, बँकेचे पासबुक, आधार कार्ड असलेली थैली चोरली. याचवेळी कुटूंबाने आरडा-ओरड केल्यानंतर सतर्क शेजार्यांनी पोलिसांना फोन केल्यानंतर चोपडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पळणाऱ्या चोरांचा फिल्मीस्टाईल पाठलाग करत २ दरोडेखोरांना पकडले मात्र अंधाराचा फायदा घेत तिघे पसार झाले.
दरम्यान, घरातील आरडा-ओरडचा आवाज ऐकून शेजारच्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलीस येत असतांना सायरनचा आवाज ऐकून दरोडेखोरांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी धरणगावरोडपर्यंत त्यांचा फिल्मीस्टाईल पाठलाग केला. अखेर पोलिसांना २ दरोडेखोरांना पकडण्यात यश आले तर तिघे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.कौसर मुसा खाटीक (वय २७) व देवेंद्र युवराज काकडे (वय ३०, दोन्ही रा.दोडाईचा),असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. तर सुलतान खालीक पिंजारी, राजा कुरेशी व एक अनोळखी असे एकूण तीन जण पसार झाले आहेत. अटकेतील दोघं संशयितांना चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरोडेखोरांच्या ताब्यातून साडेतीन हजाराची रोकड, दोन मोबाईल, दोन कोयते, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ब्रेझा गाडीत दुसर्या तीन वेगवेगळ्या नंबर प्लेट देखील पोलिसांना सापडल्या आहेत. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय जितेंद्र कल्टे यांच्या मार्गदर्शनात पथकाने कारवाई केली. दरम्यान, गुन्ह्यातील सर्वच आरोपी हे सराईत गुन्हेगार असून दोंडाईचा इथे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास एपीआय प्रशांत कंडारे करीत आहेत.