चाळीसगाव तालुक्यात पिलखोडच्या गिरणा नदीत घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील गिरणा नदीत मंगळवारी दि. २८ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पोहायला गेलेल्या तिघा भावंडांपैकी एक जण बेपत्ता झाला होता. तर दोघांना बाहेर काढून वाचविण्यात यश आले होते. बेपत्ता तरुणाचा मृतदेह अखेर बुधवारी दि. २९ रोजी धुळे येथील एनडीआरएफच्या पथकाला संध्याकाळी २४ तासानंतर वरखडे धरणात मिळून आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
ओम विजय चव्हाण (वय १८, रा. हिसवळ ता. मालेगाव जि. नाशिक) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो हिसवळ गावात आई, वडील, १ भाऊ, १ बहीण यांच्यासह राहत होता. त्याचे वडील शिक्षक असून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. ओम याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. तर परीक्षेचा नुकताच निकाल लागून तो उत्तीर्णही झालेला होता. दरम्यान, ओम चव्हाण नात्यात आजोबा वारल्यामुळे तो पिलखोड गावात आला होता. तेथे मावशीच्या २ मुलांसह तो मंगळवारी दि. २८ मे रोजी गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, पोहत असताना तिघेही बुडू लागले. काठावरील स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता दोघांना वाचविण्यात यश आले होते.
मात्र ओम चव्हाण हा नदीत बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह मिळून येत नव्हता. अखेर बुधवारी दि. २९ रोजी धुळे येथील एनडीआरएफच्या पथकाला संध्याकाळी २४ तासानंतर संध्याकाळी ५ वाजता ओमचा मृतदेह वरखडे धरणात मिळून आला आहे. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.