पाचोरा तालुक्यातील पिंप्री रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील मोंढाळे ते पिंप्री रस्त्यावर मंगळवारी दि. २८ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास खोदून ठेवलेल्या पाइपलाइनच्या खड्ड्यात भरधाव ट्रॅक्टर आदळल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. त्याखाली दबून चालक तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
अनिल बाबुलाल तडवी (वय ४०, रा. आर्वी ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आर्वी गावात आई, वडील, पत्नी, २ मुले, ३ भाऊ यांच्यासह राहत होता. अनेक वर्षांपासून ट्रॅक्टर चालवून तो मोलमजुरी करीत परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी दि. २८ रोजी नेहमीप्रमाणे तो मोंढाळे येथून पिंप्री कडे ट्रॅक्टर खाली करून जात असताना पिंप्री गावाजवळ पाईपलाइनचे खोदून ठेवलेल्या खड्ड्यात त्याचे ट्रॅक्टर आदळले. त्यात ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली अनिल हा दबला गेला. अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ धावून आले.
त्यांनी अनिल तडवी याला पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना मंगळवारी दि. २८ मे रोजी रात्री ९ वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. यानंतर बुधवारी दि. २९ मे रोजी पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला. घटनेची नशिराबाद पोलीस स्टेशनला शून्य नंबरने नोंद होऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, पिंप्री गावालगत विनापरवाना खड्डे खोदून ठेवले असल्याने अनेक ग्रामस्थांना त्याचा त्रास झाला आहे. या खड्ड्यांनी आज आमच्या कुटुंबातील तरुण कर्ता पुरुष हिरावून नेला आहे. हे खड्डे कुठलीही परवानगी न घेता खोदणाऱ्या ठेकेदार व संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी “केसरीराज”च्या माध्यमातून केली आहे.