शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या १५० या प्रवेश क्षमतेला आता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने आवश्यक ती माहिती जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मागितली होती. त्यानुसार ऑनलाईन पडताळणी आयोगाने केली. या पडताळणीत आयोगाने महाविद्यालयाच्या अहवालाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. त्यानुसार पत्र पाठवून एमबीबीएस करीता १५० प्रवेश क्षमतेसाठी जळगावसह नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आता एमबीबीएस पूर्ण करून २०१८ ची पहिली बॅच शिक्षण पूर्ण करून बाहेर पडली आहे. तर दुसरी २०१९ ची बॅच आता आंतरवासिता प्रशिक्षण घेत आहे.
महाविद्यालयाचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनात डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विश्वनाथ पुजारी यांच्यासह विद्यार्थी विभागातील कार्यालय अधीक्षक विजय पाटील, किरण बावस्कर, संदीप सोनकुसरे, आकाश महिरे, सौ. मगरे आदींनी तयार केला होता. १५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेला मान्यता मिळाल्यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.