जळगावात सायबर पोलीस स्टेशनचा यशस्वी तपास
जळगाव (प्रतिनिधी) : येथील हरेश्वरनगरमधील रहिवासी असलेल्या एका महिलेला व्हॉट्सअॅप ग्रुपवर जॉईन करत मेसेज पाठवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले आणि यातूनच त्यांची तब्बल १ कोटी ५ लाख रूपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सायबर पोलीस स्टेशनने तपास करून एका तरुणाला गुजरातमधून अटक केली आहे.
जळगावातील हरेश्वरनगरमधील रहिवासी असलेल्या महिलेचा व्हॉट्सअॅप क्रमांक एका ग्रुपमध्ये जोडून तीन जणांनी मेसेज करत ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. महिलेसह त्यांचे पती, नणंद, सासू यांच्या नावावरील दि. १६ फेब्रुवारी ते दि. २८ मार्च यादरम्यान बँक खात्यातून वेळोवेळी एकूण १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपये संशयित आरोपींची स्वीकारले. (kcn)दरम्यान, ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून महिलेसह तिचा पती, सासू, नणंद यांच्या बँक खात्यावरून वेळोवेळी रक्कम स्वीकारत आर्थिक फसवणूक झाल्या प्रकरणी चारजणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करण्यात आला. त्यानुसार संशयित आरोपी निष्पन्न झाला. त्याला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. (kcn) रामाराम छोलाराम चौधरी (वय २७, रा. जोगियो कि दादी शिवनगर, बाडमेर, राजस्थान ह. मु. गोत्री, वडोदरा, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला बुधवारी दि. २२ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी संशयित निष्पन्न होणार आहेत.