कर्नाटक एक्स्प्रेसमधील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये मनमाड ते आग्रा असा प्रवास करून राजस्थानात घरी परतणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेचा धावत्या रेल्वेत अचानक रक्तस्राव होऊन गर्भपात झाला. त्यांना जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करून शनिवारी दि. १८ रोजी सकाळी स्वगृही सुखरूप पाठविण्यात आले.
सदरहू महिलेचे पती लष्करात असल्याची माहिती मिळाली. सदर महिला राजस्थानातील अलवर जिल्ह्यात राहतात. परिवारासह त्या कर्नाटक एक्स्प्रेस मध्ये बी ५ डब्यात मनमाड ते आग्रा असा शुक्रवारी दि. १७ मे रोजी प्रवास करीत होत्या. प्रवासात अचानक त्यांना रक्तस्राव होऊ लागला. तातडीने जळगाव रेल्वे स्टेशनवर गाडी थांबविण्यात आली. रेल्वे पोलिसांनी सदर महिलेला कुटुंबियांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास दाखल केले. रुग्णालयात त्यांचा दोन महिन्यांचा गर्भ-पात होऊन गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर महिलेची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना शनिवारी दि. १८ मे रोजी रेल्वेने सुखरूप राजस्थानकडे पाठविण्यात आले.