जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे बस स्थानकाच्या परिसरात भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये १९ वर्षीय तरुण ठार झाला असून त्याची आई जखमी झाली आहे. घटनेप्रकरणी घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
अविनाश रवींद्र पाटील (वय १९, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो फोटोशॉपीच्या दुकानात काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. शुक्रवारी दि. १७ मे रोजी अविनाश त्याच्या आईला घेऊन जळगावकडे जाण्यासाठी निघाला असता कुसुंबाच्या बस स्थानकाजवळ भरधाव येणाऱ्या टँकरने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली.
या धडकेत अविनाश पाटील गंभीर जखमी झाला. घटना संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास् घडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अविनाश पाटील याला नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. अविनाश पाटील यांच्या आईला देखील मार लागला असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अविनाश याच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याच्या नातेवाईकांनी शोक व्यक्त केला.
एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शासकीय रुग्णालयामध्ये कुसुंबा येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.