जळगावात आकाशवाणी चौक रस्त्यावर घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : नाशिक विभागाचे टीबी विभागाचे अधिकारी डॉ. हर्षद भाऊराव लांडे यांना भरधाव कारने धडक दिल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना दि. ८ मे रोजी आकाशवाणी चौक रस्त्यावर हॉटेल रॉयल पॅलेस समोर घडली होती. रामानंद नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर धडक देणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळून संशयित आरोपीचा जामीन झाला असून त्याची कार देखील जप्त करण्यात आली आहे.
मुंबई येथील डॉ. हर्षद भाऊराव लांडे (वय ४३, रा. गोरवेल रोड, मुंबई) हे डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे टीबी अधिकारी म्हणून नोकरीला होते. बुधवार दि. ८ मे रोजी ते डब्ल्यूएचओच्या एका महत्वाच्या बैठकीसाठी ते जळगावात आले होते. सहकाऱ्यासोंबत जेवण केल्यानंतर ते रात्री ११ वाजेच्या सुमारास ते हॉटेलमध्ये मित्राला भेटण्यासठी गेले होते. मित्राची भेट घेतल्यानंतर ते पुन्हा निवासाकडे जाण्यासाठी निघाले. रस्ता ओलांडत असताना काव्यरत्नावली चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या एमएच १९, ईजी १६६९ क्रमांकाच्या भरधाव कारने डॉ. लांडे यांना धडक दिली. या अपघातात लांडे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कार चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करीत असतांना तपासअधिकारी पोहेकॉ इरफान मलिक यांनी त्या फुटेजसह तांत्रीक विश्लेषणाच्या आधारावर कारचालक संशयित सिव्हील इंजिनिअर असलेल्या आशिष रविंद्र देशपांडे (वय ३५, रा. दांडेकरनगर) या कारचालकाला अटक केली. त्याच्याकडून अपघातातील कार देखील जप्त करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अटकेतील संशयित आशिष देशपांडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यानंतर देशपांडे याचा जामीन झाला आहे.