पुणे (वृत्तसंस्था) – लोणंद, लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिन्यांपासून लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत बंद ठेवण्यात आलेले काद्याचे लिलाव सोमवार, 18 पासून सुरु करण्यात येणार आहेत. बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारावरील कांदा व भुसार शेतीमालाची आवक दि. 17 पासून घेण्यात येणार आहे. तर दि. 18 पासून कांद्यासह इतर शेतमालाचे लिलाव होणार असल्याची माहिती सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली. लॉकडाऊनमुळे दोन महिने लिलाव बंद ठेवण्यात आले होते. कांदा तयार होता परंतु, त्याला बाजारपेठ नसल्याने शेतकरी मार्केट कधी सुरू होतंय याची वाट पाहत होते.
करोनाच्या परिस्थितीबाबत सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती दत्तात्रय बिचुकले व संचालक यांनी आडते, बाजार समितीतील व्यापारी यांची बैठक घेवून शासकीय नियम पाळून बाजार सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार 17 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आवक व दि. 18 रोजी लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडुन लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचे करुन शेतकऱ्यांनी आपला कांदा हा शेतीमाल वाळवून, निवडून व प्रतवारी करुन विक्रीस आणावा, असे आवाहन राजेंद्र तांबे यांनी केले आहे.
सध्या खंडाळा, फलटण या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले होते. तयार झालेला कांदा माल विकण्यासाठी कोणतीच बाजार पेठ उपलब्ध नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांनी जिथे जागा मिळेल तिथे कांदा साठवून ठेवला होता. शेतात झाडाखाली ठेवलेला कांदा उन्हाळी पावसाने भिजण्याची भीती होती. आता बाजार सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, दि. 18 पासून लिलाव होणार असल्याने कांद्याची मोठी आवक होणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर किती निघणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या संकटकाळात कांदा दरात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी दर पाडून पोटावर मारू नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.