निवृत्ती घेऊनही समर्थन देणारे दादा,पुन्हा स्वगृही जाऊ पाहणारे नाथाभाऊ यांची स्थिती सारखीच !
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राजकीय ध्रुवावर एकेकाळी मातब्बर म्हणून ओळखले जाणारे दोन वजनदार नेते यांना राजकीय क्षितिजातून ‘थंड’ करण्यात भारतीय जनता पक्षाला अखेर यश आले आहे. रशियातील “पुतीन नीती” वापरू पाहणाऱ्या भाजपाला जळगाव जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात हे दोन्ही यश मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांची अडचण झाली खरी, मात्र कुठलीच गोष्ट शाश्वत नसते त्याप्रमाणे भाजपाला अखेर कुठेतरी ब्रेक नक्कीच मिळणार अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे. भाजपासाठी पुन्हा एकदा गिरीश महाजन हे ‘संकटमोचक’ म्हणून धावून आल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील माजी मंत्री तथा ४० वर्षांपेक्षा अधिक काळ काढणारे एकनाथराव खडसे हे मागील तीन वर्षे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. आता पुन्हा त्यांना उपरती सुचली असून “जुन्या मित्रांच्या आग्रहाखातर मी पुन्हा स्वगृही जात आहे” असे म्हणून ते भाजपात पुन्हा घरवापसी करीत आहे. येत्या १५ दिवसात दिल्लीत पक्षप्रवेश होईल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले खरे, मात्र महिना उलटला तरीही भाजपने अजून त्यांच्यासाठी दार उघडलेले नाही. त्यामुळे दारावर उभे असलेले नाथाभाऊ हे पक्षात कधी येतील हे भाजपाकडून कोणीही सांगू शकत नाही. याचठिकाणी भाजपच्या श्रेष्ठींनी बाजी मारली आहे. भाजपने प्रवेश दिलेला नाही व राष्ट्रवादी सोडली आहे अशा स्थितीत एकनाथरावांना आज “बाजूने व विरोधात” अशी कुठलीच ठाम भूमिका घेता येईना झाले आहे. येथेच भाजपने एक लढाई जिंकली आहे.
दुसरीकडे नाथाभाऊंचे विरोधक राहिलेले सुरेशदादा जैन हे भाजपच्या टार्गेटवर आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट हे सुरेशदादांचे फोटो बॅनरवर लावत असल्याने भाजपला खुपले. त्यांनी तातडीने दादांना आपल्याकडे वळविले. यामागे नेमकी कारणे काय हे भाजपच्या गोटातून ठोस कोणी सांगत नसले तरीही आज सुरेशदादांवर दबाव टाकून त्यांचा पाठिंबा मिळविला हे विरोधी पक्षाचे सांगणे खूप काही सांगून जाते. सुरेशदादांनी भाजपच्या उमेदवारांना समर्थन दिले. मात्र दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राजकीय निवृत्ती घोषित करणाऱ्या दादांनी भाजपच्या उमेदवारांना समर्थन देऊन पुन्हा राजकीय भूमिका घेण्याची गरज ती काय ? हे राजकीय वर्तुळात न समजण्यासारखे झाले आहे. याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.