मुंबई (वृत्तसंस्था) – दौंड – दहिटणे (ता. दौंड) येथील 70 वर्षीय बाधित रुग्णाने करोनावर मात केल्याचे वृत्त समजताच दौंडकरामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र तालुक्यात शनिवारी (दि. 16) नव्याने आणखी पाच करोना रुग्ण आढळून आल्याने सगळ्यांच्या आनंदावर विर्जण पडले. तर यातील तिघे जवान असल्याने करोना दौंडमधील जवानांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे.
दौंड शहरातील एक, राज्य राखीव पोलीस दलातील एक व भारतीय राखीव पोलीस (आयआरबी) मधील तीन जवान शनिवारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंड राज्य राखीव पोलीस दलातील जवान राज्यातील विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी जात असतात. बंदोबस्तावरुन आल्यांनतर त्यांचे विलीगीकरण करण्यात येत आहे. राज्य राखीव दलातील एका जवानास करोनाची लागण झाली आहे. भारतीय राखीव पोलीस दलातील तीन व दौंड शहरातील एकास करोनाची लागण झाली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत 30 नागरिकांना करोनाची लागण झाली असून यातील 9 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
शनिवारी (दि. 16) पॉझिटीव्ह सापडलेल्या रुग्णांना पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे पालन करून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. डांगे यांनी केले आहे.