जळगाव तालुक्यातील शिरसोली ते दापोरादरम्यानची घटना
मध्यप्रदेशातील दहा वर्षीय बालिकेच्या कुटुंबियांचा शोध सुरू
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली रेल्वे स्थानकापुढे पहाटे पाच ते सहा वाजता एक रेल्वेगाडी थांबली. या गाडीतून एक दहा वर्षाची मुलगी पाण्याची बाटली घेण्यासाठी खाली उतरली असता रेल्वे निघून गेली. त्यामुळे तिची तिच्या परिवारापासून ताटातूट झाली. अखेर शिरसोली ते दापोरा ग्रामस्थांनी तिला ताब्यात घेऊन रेल्वे पोलीस स्टेशनला दाखल केले आहे. तेथे या मुलीला तिच्या कुटुंबीयांची भेट घालून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
शिरसोली ते दापोरा रेल्वे स्थानकादरम्यान आज मंगळवार दि. ७ एप्रिल रोजी पहाटे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान एक रेल्वे अचानक थांबली. या रेल्वे गाडीतून पाणी घेण्यासाठी आई खाली उतरली तीच्या मागे तीची दहा वर्षांची लक्ष्मी ही मुलगी खाली उतरली. आई रेल्वेत पाणी घेऊन चढली मात्र मुलगी लक्ष्मी ही रेल्वे निघून गेल्यामुळे ती तिथेच राहून गेली. सकाळी ७ वाजेच्या सुमारास दापोरा शिवारात शेतात ही मुलगी फीरत होती. काही ग्रामस्थांच्या मदतीने तिची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला ती खूप रडत होती व तिच्या स्थानिक भाषेमुळे तिची माहिती समजत नव्हती.
अखेर काही वेळाने तिने थोडी माहिती दिली. तिचे नाव लक्ष्मी राकेश आहेरबान् (वय १०, रा. बस्ता, पो. खतना, मध्यप्रदेश) असे तिने सांगितले. ती इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. मुंबईवरून मध्य प्रदेशातील जबलपूर येथे नातेवाईकाकडे आई व भावासह ती जात होती. सकाळी आई खाली उतरली व आईसोबत मी पण उतरली असे असे ती सांगत आहे. तिचे वडील गावाकडे स्वयंपाकी असून उजव्या हातावर ओम गोंदलेले आहे.
दरम्यान दापोरा पोलिस पाटील जितेंद्र गंवदे व दापोरा ग्रामस्थांनी सदर मुलीला रेल्वे पोलीस स्टेशनला दाखल केले असून पोलीस पुढील तपास करून तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.