छत्रपती संभाजीनगर येथील घटना, संशयित आरोपी जामनेर तालुक्यातील
जामनेर (प्रतिनिधी) : अनैतिक संबंधात पती कायम अडसर ठरू लागल्याने पत्नीने प्रियकर व त्याच्या तीन साथीदाराची मदत घेत पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहरात घडली होती. पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर जामनेर तालुक्यातील पहूरमधील तिघांसह छत्रपती संभाजी नगरातील प्रियकर व प्रेयसी असलेली संशयित आरोपी पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहुर येथून अटक केली आहे. अटकेतील चौघांना छत्रपती संभाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा त्याच्या पत्नीने चौघा साथीदारांच्या मदतीने सुपारी देऊन हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
गणेश जगन्नाथ दराखे (वय ३४,रा.छत्रपती संभाजीनगर) असे मयताचे नाव आहे. रुपाली गणेश दराखे (रा.संभाजीनगर) या विवाहितेचे सुपडू सोनू गायकवाड (३५, कुर्हाड, ता.पाचोरा) या तरुणाशी सूत जमले होते. मात्र अनैतिक संबंधात पती गणेश दराखे अडसर ठरू लागल्याने पत्नीनेच पतीचा काढा काढण्याचे ठरवले. ही बाब प्रियकराजवळ बोलून दाखवली. त्यातच गणेश दराखेने आपले घर २१ लाख रुपयात विक्री केल्यानंतर रक्कम आल्यानंतर पत्नीने प्रियकरासोबत दोन लाखात पतीला मारण्याची पहूरच्या अमोल चौधरीला सुपारीही दिली. ४ मे रोजी बांधकाम मिस्तरी असलेला गणेश दराखे हा कामावर निघाल्यानंतर रस्त्यात आरोपींनी गाठत त्याची गळा चिरून हत्या केली.
संभाजीनगर पोलिसांना खुनाबाबत संशय आल्यानतंर त्यांनी पत्नी रुपाली दराखेला ताब्यात घेतल्यानंतर बोलते करताच तिने अनैतिक संबंधाची कबुली दिली. छत्रपती संभाजीनगरातील गणेश दराखे या तरुणाचा खून केल्याप्रकरणी पहूर येथील अमोल चिंतामण चौधरी (३३), अजय दिलीप हिवाळे २५), अनिकेत कडूबा चौथे (२४, सर्व राहणार पहूर कसबे, ता.जामनेर जि.जळगाव) यांना यांना अटक करण्यात आली. तिघांविरोधात संभाजीनगरच्या सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, हवालदार संजय नंद, विजय निकम, विजय भाणुसे, मनोहर गीते, चालक संतोष चौरे आदींनी पहूरचे निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील अंमलदार गोपाल गायकवाड, ज्ञानेश्वर ठाकरे, विलास चव्हाण यांच्या मदतीने पहूर येथील तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, अनिकेत चौथे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.