भुसावळ येथील कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांचे मार्गदर्शन
भुसावळ (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा निवडणूक हि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्वाची निवडणूक आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात आता आपल्याला यश मिळवायचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीत उमेदवार श्रीराम पाटील यांना विजयी करायचे आहे, असे मार्गदर्शन कार्यकर्ता आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केले.
भुसावळात मेळाव्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आ. सतीश पाटील, काँग्रेसचे आ. शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आ. संतोष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक प्रसेंजित पाटील, माजी आ. दिलीप सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी अध्यक्ष शरद पवार यांचा सत्कार केला. प्रसंगी जयंत पाटील यांनीदेखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी सतत व्यूहरचना करून त्यांना निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच, जिल्ह्यातील नेत्यांनीही एकजुटीने अधिकाधिक प्रचाराची धुरा सांभाळून पक्षासाठी यश मिळविणार असल्याबाबत ग्वाही दिली. प्रसंगी रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.