रावेर लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथरावांचे घराणे चर्चेत
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंजक व विविध किस्स्यांनी प्रसिद्ध होत आहे. यातच आता माजी मंत्री व मुक्ताईनगरातील एकनाथराव खडसे यांचे घराणे तर विशेष चर्चेत आले आहे. मतदारसंघात भाजपने रक्षा खडसेंना तिकीट दिले आहे. त्यामुळे त्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढत आहे. तर दुसरीकडे मात्र रक्षा खडसेंच्या नणंद रोहिणी खडसे या विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे श्रीराम दयाराम पाटील यांचा प्रचार करीत आहेत. मतदारसंघात एकीकडे मुलगी ‘तुतारी वाजविणारा माणूस’ ला मत द्या म्हणतेय तर दुसरीकडे सून ‘कमळ’ ला मत द्या असे आवाहन करीत प्रचार करीत आहे. त्यामुळे एकनाथराव खडसेंच्या घराण्याची अजब कहाणी चर्चेचा विषय ठरत आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. प्रमुख उमेदवार भाजपचे रक्षा खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे श्रीराम दयाराम पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले आहे. रावेर मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचत आहे. एकनाथरावांची सून रक्षा खडसे या भाजपाकडून कमळ चिन्हावर लढत आहे. गावागावात जाऊन त्या विजयी करण्याचे आवाहन करीत आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारात रोहिणी खडसे यांनी जोरदार सहभाग घेतला आहे. विविध गावागावात जाऊन त्या श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांचे पक्षाचे चिन्ह ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हाला मत देण्याबाबत सांगत आहे. इतकेच नव्हे, त्या वर्धा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांच्याही प्रचाराला जाऊन आल्या आहेत. तेथेही त्यांनी सत्ताधारी पक्षाचा खरपूस समाचार घेऊन टीका केली आहे.
नणंद-भावजयीच्या या प्रचारयुद्धात मात्र एकनाथरावांना दीड महिन्यात दोन्ही भूमिका घ्याव्या लागल्या. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे एकनाथराव सांगत होते. नंतर दीडच महिन्यात त्यांनी भाजपात घरवापसी करणार असल्याचे सांगितले. आता तर, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा राजीनामा दिल्याने भाजपा व इतर कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याबाबत माहीती दिली आहे. त्यामुळे एकनाथराव खडसेंच्या घराण्याची अजब कहाणी चर्चेचा विषय ठरत आहे.