सोयगावजवळ दुर्घटना
सोयगाव (प्रतिनिधी) : दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक होऊन दोन जण जागीच ठार झाले असून, दोन गंभीर झाल्याची घटना वरठाण तिडका रस्त्यावर सोमवार, दि. १५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
सुनील विक्रम बागुल (वय. ३३, रा. वाडीसुतांडा, ता. सोयगाव) आणि काशिनाथ विठ्ठल पाटील (वय ३२. रा. पिंप्री, ता.पाचोरा) अशी मयतांची नावे आहेत. पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील काशिनाथ पाटील व राहुल पाटील हे दोघे दुचाकी क्र. एमएच-१९- ईएच-९८११ ने पिंप्री येथून किन्ही येथे जात होते. तर सोयगाव तालुक्यातील वाडीसुतांडा येथील सुनील बागुल व सतीश मोरे हे दोघेदुचाकी क्र. एमएच-१९-बीडब्लू-८५४२ ने वाडी येथून तिडकाकडे जात होते. तेव्हा वरठाण तिडका रस्त्यावर दोघांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सुनील विक्रम बागुल व काशीनाथ विठ्ठल पाटील हे जागीच ठार झाले.
राहुल त्र्यंबक पाटील (रा. पिंपरी), सतीश सखाराम मोरे (रा. वाडीसुतांडा) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपनिरीक्षक रज्जाक शेख, जमादार संदीप सुसर, विकास दुबेले, श्रीकांत तळेगावकर जावून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना पाचोरा येथील दवाखान्यात पाठविले. दरम्यान, सायंकाळी घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. या अपघातातील मयत पिंप्री येथील काशिनाथ पाटील याचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता.