पुणे (वृत्तसंस्था) – उजनी धरणात पाण्याची पातळी फारच कमी झाल्याने उजनी काठावरील शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दरवर्षी पाण्यासाठी उजनी काठावरील शेतकऱ्यांना रडावे लागत आहे. मागील वर्षीच लाखो रुपये खर्च करून उजनी धरण क्षेत्रात चाऱ्या काढण्यात आल्या होत्या या चाऱ्याच आता शेतकऱ्याचा आधार आहेत. उजनी काठावरील गावात अशा प्रकारच्या चाऱ्या काढण्यात आलेल्या आहेत. पाइप व केबलचा खर्च कमी करण्यासाठी पन्नास ते साठ शेतकरी मिळून लाखो रुपये खर्च करून चाऱ्या काढत आहेत. या चारीच्या साह्याने पाणी विद्युुत पंपापर्यंत पोहोचवले जाते. इंदापूर तालुक्यातील पळसदेव, डाळज, भावडीसह नदी काठावरील गावात ही परिस्थिती आहे.
उजनी धरणग्रस्तांच्या हक्काचे पाणी अद्याप कायम करण्यात आले नसल्याने दरवर्षी नदी पात्रातील पाणी जसे कमी होते, त्याप्रमाणे पाइप आणि केबल वाढवून शेतकरी पिकाला पाणी देत असल्याचे चित्र दरवर्षी उन्हाळ्यात उजनी काठावर दिसते. ही परिस्थिती असताना अद्याप एकाही राजकीय नेत्याला उजनी धरणग्रस्तांच्या व्यथा कायमस्वरूपी सोडवण्यात यश आले नाही. सध्या एका-एका चारीवर पन्नास ते साठ-सत्तर विद्युत पंपांचे जाळे आहे.
मागील उन्हाळ्यात पाण्यासाठी पळसदेव भागातील एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता. तरी देखील या वर्षी पुन्हा तीच परिस्थिती आहे. उन्हाळ्यात शेतीच्या पाण्यासाठी धरणग्रस्तांच्या संघर्ष कायमच राहिला आहे. पाण्याअभावी पिके जळू नयेत यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करून, पाइप आणि केबल वाढवून पिकाला पाणी देण्यासाठी धडपडत आहे.