जळगाव शहरातील वडामया नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील असोदारोड, वडामया नगरामध्ये एका बंद गोठ्यामधील ११ बकऱ्यांवर भटक्या कुत्र्यांनी मध्यरात्री हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना रविवार दि. ३१ मार्च रोजी पहाटे उघडकिस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पशुपालकाचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाकडून भरपाई मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
प्रकाश चिंतामण कोळी (वय ४५) हे जळगाव शहरात असोदा रोडवरील वडामयानगर येथे परिवारासह राहतात. त्यांच्या घराजवळ एक गोठा त्यांनी तयार केला आहे. त्या ठिकाणी त्यांनी १३ बकऱ्या पाळल्या असून त्यापासून मिळणाऱ्या साधनांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान शनिवारी ३० मार्च रोजी रात्री त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये दहा वाजेच्या सुमारास सर्व बकऱ्या व त्यांचे काही पिल्ले बांधून ठेवले होते. मध्यरात्री दुसऱ्या दिवशी कधीतरी भटक्या कुत्र्यांनी बंद गोठ्यात घुसून बकऱ्यांवर हल्ला केला. त्यात काही पिल्लांसह अकरा बकऱ्या ठार झाल्या आहेत.
सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर पशुपालक प्रकाश कोळी व त्यांच्या परिवाराने आक्रोश केला. यावेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येऊन माहिती जाणून घेतली. दरम्यान भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वडामया नगरसह काही दिवसांपूर्वी धनाजी काळे नगरात एका लहान मुलीला कुत्र्यांनी चावा घेतला होता. तेव्हा नागरिकांनी सदर मुलीच्या जीव वाचवला होता. उस्मानिया पार्क येथे देखील दोन जणांवर भटक्या कुत्र्यांनी गंभीर हल्ला केला होता.
छत्रपती शिवाजीनगर परिसरामधील या विविध सात ते आठ कॉलन्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून महानगरपालिकेने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. पशुपालक प्रकाश कोळी यांच्या दीड लाख रुपयांच्या नुकसानी प्रकरणी शासनाकडून भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी वडामया नगरामधील ग्रामस्थांनी केली आहे.