जळगाव (प्रतिनिधी) :- विद्यमान खा. उन्मेष पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची यादी पाहिली तर आपल्याला त्यांच्या कामाबद्दल नक्कीच समाधान् मानता येईल. लोकप्रतिनिधी हे जनतेच्या कामासाठी बांधील असतात आणि जनसेवेसाठी बांधील असताना लोकप्रतिनिधींना विकास कामांबाबत भान ठेवावे लागत असते. विद्यमान खा. उन्मेष पाटील यांनी जनसेवेबद्दल गेल्या पाच वर्षांमध्ये जाणीव ठेवून विविध योजना आणि निधींबाबत पाठपुरावा देखील केला आहे. त्याबाबत मंजुरी देखील मिळाली आहे. याबाबत सविस्तर माहिती “केसरीराज” च्या माध्यमातून जनतेसाठी जाणून घेतली आहे.
खा. पाटील यांनी पीएम किसान सन्मान योजनामध्ये २ लाख ३३ हजार ६२६ लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे. तर जलजीवन मिशन ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना यामध्ये ७४६ योजनांसाठी मंजुरी मिळाली आहे. उज्वला योजना, उडान प्रकल्प, शामाप्रसाद मुखर्जी योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान गटांना कर्ज वाटप, इंदिरा आवास योजना याचबरोबर खासदार स्थानिक विकास निधीमध्ये २१ कोटी मंजूर करून आणले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पामध्ये चिखली ते तरसोद चौपदरीकरण प्रकल्पकरीता १ हजार ४८ करोड रुपयांच्या योजना आणल्या गेल्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये ५८ कोटी ५६ लक्ष ५६ हजाराच्या योजना मंजूर झाल्या. यात एरंडोल, चाळीसगाव, अमळनेर, जळगाव, पारोळा आदी तालुक्यांमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण झाले.
पर्यटन क्षेत्रासाठी ५५ कोटींच्या जवळपास निधी प्राप्त झाला आहे. मृद व जलसंधारण योजनेत २ हजार ३३६ लक्ष निधी मिळाला. सामूहिक शेततळे योजनामध्ये ९१ लाख ५३ हजार रुपये, मूलभूत सुविधा पथदिवे यासाठी १४५ गावांमध्ये पाच कोटी रुपये, जळगाव शहराच्या हायमास्टसाठी १कोटी रुपये, वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात कडधान्य-तृणधान्य-भरडधान्य-कापूस विकास कार्यक्रम यासाठी सुमारे २ हजार लाखापेक्षा अधिक रुपये त्यांनी मंजूर करून आणले आहेत. सिमेंट नाला बांधणे यासाठी ५६लाख रुपये खर्च झाले आहेत. अटल सौर कृषी पंप योजनेसाठी ८ कोटी ४२ लाख ४१ हजार मंजूर झालेत. त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन, वैयक्तिक स्वच्छालय, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, राष्ट्रीय कृषी विकास योजनेत कांदा चाळ उभारणी, शेततळे अस्तरीकरण, होळकर रोपवाटिका यासह फलोत्पादन पीक, कीड, सर्वेक्षण, सल्ला व्यवस्थापन प्रकल्पांसाठी लाखो रुपयांचे निधी खासदार उन्मेष पाटील यांनी आणले आहेत.
उन्मेष पाटील यांच्या कामाचा लेखाजोखा आणखी बराच मोठा आहे. पण थोडक्यात पाहिला तर आपल्याला त्यांच्या कामाबद्दल नक्कीच आनंद व समाधान मानता येईल. उन्मेष पाटील यांना आज भाजपातर्फे तिकीट मिळाले नसले तरी मतदारसंघातील जनता आजही उन्मेष पाटील यांच्या पाठीशी आहे असे एकंदरीत चित्र गावागावातून दिसून येत आहे.