अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : बेळगाव कॅन्टीनमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून २ लाखांची फसवणूक केल्याने नैराश्येपोटी अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील सागर संजय बैसाणे वय-२३ या तरूणाने अमळनेर येथे धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना २२ जानेवारी २०२४ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चौकशीअंती अखेर सांगली जिल्ह्यातील ३ जणांविरोधात सोमवारी दि. १८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर संजय बैसाणे याला ७ ऑगस्ट २०२१ ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान सुशांत सुनील उबाळे(रा. वाळेखिंडी ता. जत, जि. सांगली), अनिल भरत कांबळे (रा. म्हैसाळ ता. मिरज, जि. सांगली) आणि महादेव विलास सातपुते (लोणारवाडी ता. कवठे महाकाळ जि. सांगली) यांनी बेळगाव कॅन्टीन येथे सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत सागर बैसाणे यांच्याकडून ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी सागरने तिघांना २ लाख रूपये दिले होते. परंतु सागर याला सरकारी नोकरी लावून न देता खाजगी स्वरूपात मजुरीने काम लावून दिले.
दरम्यान सागर बैसाणे याने २ लाख रुपये परत मागितले होते, ते पैसे त्याला परत मिळाले नाही म्हणून यांनी नैराश्यपोटी सागर बैसाणे याने २२ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अमळनेर येथील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली होती. ही घटना घडल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली, या चौकशी दरम्यान या तिघांची नावे समोर आली. त्यानुसार मयत सागर बैसाने याचे काका सुभाष रामचंद्र बैसाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार दि. १८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुशांत सुनील उबाळे, अनिल भरत कांबळे आणि महादेव विलास सातपुते या तिघां विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.