जळगाव ( प्रतिनिधी) –शहरातील प्रभात चौकातील हॉटेल पांचाली या परमीटरूमचा एफएल 3 प्रकारातील परवाना जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी आज कायमस्वरूपी रद्द केला.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी या हॉटेलमधील साठा व नोंदींची 28 एप्रिल रोजी तपासणी केली होती. त्यावेळी तेथे परवानाधारक भारती जाधव यांचे पती अजय जाधव उपस्थित होते. दोन पंचांसमक्ष ही तपासणी करण्यात आली होती,. 20 मार्चपर्यंत नोंदी त्यांच्या रजिस्टरमध्ये होत्या मात्र नोंदी व साठ्यात तफावत आढळून आली होती. नोंदींपेक्षा प्रत्यक्ष साठा कमी होता. विना परिवहन पास व नोंद नसलेला साठाही होता. या तपासणीच्या आधी 26 एप्रिल रोजी हॉटेल पांचालीचा मॅनेजर हर्षल बारी याला पोलिसांनी मद्याची बेकायदा वाहतूक करताना मद्यसाठ्यासह अटक केली होती . त्याच्या या गुन्ह्याची माहिती शनिपेठ पोलिसांनी राज्य उत्पादन खात्याला दिल्यानंतर ही तपासणी करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे वरणगावातील विनोद ब्रँडी नावाच्या वाईन शॉपचीही राज्य उत्पादन खात्याकडून तपासणी करण्यात आली असून त्या तपासणीत सुमारे 450 मद्याच्या बाटल्यांच्या साठ्याची तफावत आढळून आल्याचे समजते . आता या परवानाधरकाविरोधात काय कारवाई होते?, याची वरणगावात उत्सुकता आहे.








