चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला 07 मार्च रोजी ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन आले असताना, तालुक्यातील पोलिस पाटील संघटनेने त्यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुमच्या विषयाबाबत अतिशय सकारात्मक असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत निर्णय होणार असल्याचे आश्वासन दिले होते. अखेर बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलिस पाटलांच्या मानधनवाढीचा निर्णय झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी आपला शब्द पाळला आहे. त्याबद्दल सर्व पोलीस पाटील संघटनांनी दोन्ही मंत्री तसेच त्यासाठी पाठपुरावा करणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
कायदा सुव्यवस्था दृष्टीने महत्वाच्या घटकाला भाजपा महायुती सरकारने न्याय दिला- आमदार मंगेश चव्हाण
पोलीस व गाव यातील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात. अनेक कठीण प्रसंगात त्यांची मोलाची मदत प्रशासनाला होत असते. मात्र त्यांना मिळणारे अतिशय अल्प मानधन व शासनाकडून कोणत्याही भरीव सुविधा त्यांना मिळत नसल्याने त्यांच्या विविध मागण्यांसाठी माझा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. मागील काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सन 2019 मध्ये पोलीस पाटील पदावरील व्यक्तींचे मानधन 3000 रूपयांवरून 6500 रूपये करण्यात आले होते. मात्र नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच पोलीस पाटील वर्गाला न्याय देऊ शकतात याचा मला विश्वास होता. त्यानुसार भरघोस अशी मानधनवाढ करण्याचा मंत्री मंडळ बैठकीत निर्णय झाल्याने ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या एका जबाबदार घटकाला भाजपा महायुती सरकारने न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.