जळगाव येथील जिल्हा उद्योग केंद्र येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी व त्या करिता म्हशी विकत घेण्याकरिता कर्ज मिळण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात एका तक्रारदराने अर्ज केला होता. त्यासाठी एक खाजगी महिलेने तेथील अधिकाऱ्यांच्या नावाने तक्रारदाराला ३० हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता १० हजार रुपये स्वीकारताना त्यांना बुधवार दि. १३ मार्च रोजी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
तकारदार यांची मौजे पुरी, ता. रावेर जि. जळगांव येथे वडीलांच्या नांवे वडीलोपार्जित बागायत शेत जमीन असुन त्यांना सदर शेत जमीनीमध्ये दुग्ध व्यवसाय सुरु करायचा असल्याने म्हशी विकत घेण्यासाठी कर्ज मिळण्याकरीता ते ८/१० दिवसापुर्वी जिल्हा उदयोग केंद्र, जळगांव कार्यालयात गेले होते. तेथे हजर असलेल्या संशयित आरोपी विदया परेश शाह (खाजगी महिला) यांनी तक्रारदार यांना त्यांची जळगांव कार्यालयातील अधिकारी यांचेशी ओळख असल्याचे सांगितले.
त्यांचेकडुन कर्ज प्रकरण मंजुर करुन घेवुन संबंधीत अधिकारी यांना देण्याकरीता ३०,०००/- रुपये तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याची लेखी तकार तकारदार यांनी दि. १२ मार्च रोजी दिली होती.
सदर तकारीची रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान संशयित विदया शाह यांनी तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन आज दि. १३ रोजी दुपारी ०२:१५ वाजेच्या सुमारास सदर लाचेची रक्कम जिल्हा उदयोग केंद्र, जळगांव कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, कविता गांगुर्डे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.