पुणे (वृत्तसंस्था) – करोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या सर्व शैक्षणिक संस्थांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्षाचे पूर्ण शालेय शुल्क न घेता केवळ 50 टक्के शालेय शुल्क घेवून पालकांना आधार द्यावा. तसेच, नवीन प्रवेश प्रक्रिया करताना ‘डोनेशन’ अथवा विकास निधीसुद्धा कमी करुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत मानवतेच्या दृष्टीने विचार करावा, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.
करोना आणि प्रशासनाच्या उपाययोजना याबाबत बोलताना आमदार शेळके म्हणाले की, मावळ तालुक्यात करोनाचा शिरकाव होवू नये म्हणून पोलीस खात्यातील पोलीस बांधव, आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स आणि संबंधित कर्मचारी, सर्व शिक्षक आणि अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स गेल्या 50 दिवसांपासून अथक परिश्रम घेत आहेत. त्यांना सहकार्य करण्यासाठी सामाजिक स्वयंसेवी संस्था, दानशूर नागरिक आणि स्वयंसेवक खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.
तळेगाव दाभाडे येथील परिचारिका करोना योद्धा म्हणून काम करीत होती. संबंधित भगिनी करोना पॉझिटीव्ह आढळली होती. पण, आता संबंधित भगिनीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मावळ तालुक्यातून पुणे-पिंपरी-चिंचवड आदी भागांमध्ये अत्यावशक सेवा देणारे अर्थात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, शेतकरी, दूध व्यावसायिक यांची संख्या सुमारे 2 हजार इतकी आहे. यापुढेही तालुक्यातील नागरिकांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.