जळगावात गटविकास अधिकाऱ्यांनाही गौरविले
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा परिषदेत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उत्कृष्ट शेतकरी म्हणून जळगाव तालुक्यातील शिरसोलीचे अनिल राजाराम ताडे तसेच गाढोदाचे फकीरचंद पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यासह विविध गटविकास अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.
जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, महिला बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
घरकुल योजने संदर्भातली माहिती देताना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी सांगितले की अमृत आवास योजना, शबरी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, तसेच मोदी आवाज योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुले मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्ह्याने मोठी कामगिरी केली असल्यामुळे घरकुलांमध्ये दिलेली उद्दिष्ट साध्य होण्यास मदत झाली आहे. यावेळी उत्कृष्ट शेतकरी म्हणून अनिल राजाराम ताडे शिरसोली तसेच भगवान फकीरचंद पाटील, गाढोदा यांना शाल श्रीफळ पुष्पहार तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर घरकुल योजनेत उत्कृष्ट काम करणारे गट विकास अधिकारी,यावल, गटविकास अधिकारी बोदवड, जामनेर, धरणगाव, भुसावळ येथील गट विकास अधिकाऱ्यांना देखील गौरविण्यात आले.
पंतप्रधान आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोरगाव ता. जामनेर, देवगाव ता. पारोळा, खेडगाव ता. एरंडोल, हिंगणा बुद्रुक ता. अमळनेर, कानळदा ता. जळगाव व चिंचोली ता. यावल येथील सरपंच, ग्रामसेवक यांनादेखील प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळालेले अनिल ताडे यांच्या पत्नी मनीषा ताडे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विलास बोंडे यांनी तर आभार प्रदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी केले.