जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील खानदेश मिल कंपाऊंड मध्ये असणाऱ्या बाबा हरदासराम मार्केटमध्ये दुकान देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी ३ कोटी ७३ लाख रुपये घेऊन दुकान परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकून फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र रोशनलाल नाथानी (वय ५०, रा. गणेशनगर, जळगाव) हे व्यावसायिक असून त्यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी खुबचंद प्रेमचंद साहित्या, त्यांचा भाऊ अनिल प्रेमचंद साहित्या, ममता अनिल साहित्या, नितीन खुबचंद साहित्या यांनी गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील खानदेश मिल कॉम्प्लेक्स मधील बाबा हरदासराम मार्केटमध्ये दुकान देण्याचे आमिष महेंद्र नाथानी यांना दाखविले. त्याकरिता त्यांच्याकडून व त्यांच्या भाऊ आनंद यांच्याकडून १ कोटी ४५ लाख तसेच कॅनरा बँकेच्या खात्यातून १ कोटी ७८ लाख रोख घेतले. तसेच बयाणा रक्कम म्हणून वेळोवेळी दिलेले रोख ५० लाख असे एकूण ३ कोटी ७३ लाख रुपये फिर्यादी नाथानी यांनी साहित्या यांना दिले.
फिर्यादी व त्यांचे भाऊ यांच्याशी रक्कम घेऊनही सौदा केलेली दुकाने मात्र साहित्या परिवाराने दुसऱ्या व्यक्तीला परस्पर विक्री केली. तसेच सौद्यापोटी घेतलेली रक्कम सुद्धा परत न करता फिर्यादी व त्यांच्या भाऊ आनंद यांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहे.