जळगावातील उच्चभ्रू परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन दुचाकीस्वारांनी जबरीने ओढून नेले. ही घटना मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी आनंद नगरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता विजय जयस्वाल (५०, रा. नेहरु नगर) यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. कविता जयस्वाल मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आनंद नगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळून पायी जात असताना पाठीमागून दुचाकीने अज्ञात दोन जण आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून नेले. ही घटना घडल्यानंतर महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोन्ही चोरटे पसार झाले.
या प्रकरणी महिलेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करीत आहेत.









