प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवाचे आयोजन
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- फर्निचर व्यवसाय करीत असतांना आपण आपल्या पारंपारीकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे मत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांनी रावेर येथे श्री प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवाप्रसंगी केले आहे.
रावेर येथे श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय विकास मंडळ द्वारा आयोजित श्री प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरिश गणवाणी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार दीपक नगरे, चंद्रकांत विचवे, संतोष कोसोदे आदी मान्यवर उपस्थित होते. नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिराच्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रतिमा पूजन झाल्यानंतर हरीश गणवानी यांनी विश्वकर्मा मंदिर उभारण्यासाठी सर्वतोपारी मदत करणार असल्याचे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी देखील अडचणी सोडविण्यासाठी आश्वासन दिले. दिपक नगरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि, आज सर्वच तरुण सरकारी नोकरीच्या मागे धावत आहेत.पण आपलें पारंपरीक व्यवसाय सांभाळत असतांना तांत्रिक शिक्षण घेतले तर सरकारी नोकरीच्या वाटा देखील मोकळ्या होतात. कुशल कामगार मिळणे सर्वत्र मुश्किल आहे. आपला पारंपरीक व्यवसाय आपण सुरु ठेवावा. यात आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आहेच. चंद्रकांत विचवे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्रभुदास रुले यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सुतार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन सपकाळ, खजिनदार बबनराव रुले, पांडुरंग मिस्त्री, गोपाळ जंजाळकर, गंगाराम मिस्त्री, गोकुळ सुतार, लक्ष्मीकांत जवरे, कैलास सुतार, ज्ञानेश्वर सुतार, बापू जंजाळकर, मीनाताई जंजाळकर, सतीश जंजाळकर, रमेश जवरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.