चोपडा तालुक्यातील देवगावच्या ग्रामसेवकाला एसीबीकडून अटक
जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील देवगाव पारगाव येथे वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीची परवानगी मिळाली होती. या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी देवगाव पारगावच्या ग्रामसेवकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी करण्यात आली. यामुळे चोपडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील ३३ वर्षीय व्यक्तीने याबाबत तक्रार दिली होती. तक्रारदारांचे पारगाव येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीचे परवानगी मिळावी म्हणून तक्रारदारांनी दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. संशयित आरोपी ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय ३९) यांनी वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली. केलेल्या कामाचा मोबदला व बक्षीस म्हणून तक्रारदारांकडे ७ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला. बुधवारी दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता संशयित आरोपी ग्रामसेवक सोनवणे यांनी तडजोडीअंती तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांना अटक करून त्यांच्यावर अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन एन जाधव, फौजदार सुरेश पाटील, सहायक फौजदार दिनेश सिंग पाटील, पोना बाळू मराठे, शिपाई राकेश दुसाने, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली आहे. दरम्यान जिल्ह्यात कोणीही शासकीय कार्यालयात लाच मागत असेल तर त्या संदर्भात तक्रार द्यावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.