यावल तालुक्यातील अकलूद येथील घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अकलूद येथे बंद घर अज्ञात चोरटयांनी फोडून घरातील साडे पाच लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी २९ रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश गुनघरजी नखाते (जैन), (वय-४५, रा. समर्थ नगर, अकलुद, ता. यावल) पत्नी- ज्योती, मुले-तेजल व जय अशा परिवारासह वास्तव्याला आहे. प्रॉपर्टी बोकरचे काम करुन उदरनिर्वाह करतात. २७ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता अकलुद येथुन मुंबई येथे सेमीनारसाठी ते गेले होते. तर ज्योती नखाते ह्या रात्री साडेनऊ वाजता अकलुद येथुन अकोला येथे गेल्या.
२९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेचे सुमारास नखाते हे मुंबई येथुन अकलुद येथे आले असता त्यांना घरफोडी झाल्याचे समजले. अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याची अंगठी, सोन्याचे हार, सोन्याचे डोरले, सोन्याची पोत, कानतले असे एकुण ११ लाख ७ हजाराचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजेश नखाते यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरधर लोखंडे हे करीत आहे.