मुक्ताईनगर : तालुक्यातील उचंदे परिसरातील दीर्घ प्रतिक्षेतील सात गावांच्या सामूहिक पाणीपुरवठा योजनेची महत्वपूर्ण बैठक बुधवार दि. १३ मेे रोजी उचंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये उचंदे सह सातही ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
तालुक्यातील उचंदे, पुरनाड, शेमळदे, पंचाने, मेळसांगवे, मुंढोळदे, मेंढोदे या सात गावाला लागून तापी व पूर्णा नदीचा विस्तीर्ण लाभलेला आहे. मात्र येथे पाणीपुरवठा योजना नसल्याने या सातही गावातील नागरिकांना क्षारयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना या पाण्याचा त्रास होत आहे. किडनी स्टोन व किडनीच्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात शुद्ध पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी आहे. याच संदर्भात मुक्ताईनगर येथे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यात आ. चंद्रकांत पाटील यांनी उचंदे परिसरासाठी सामूहिक पाणीपुरवठा योजना व्हावी अशी मागणी केली होती. त्यानुसार १३ मे रोजी आमदार पाटील यांनी उचंदे परिसरातील सात गावांचे सरपंच, ग्रामसेवक व मोजक्या ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये संबंंधित ग्रामपंचायतीनी तातडीने ठराव घेऊन, प्रस्ताव सादर करावा. जेणेकरून शासनाकडे लवकरात लवकर ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी योजनेची मंजुरी संदर्भात घोषणा केली असल्याचे सांगीतले. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा हा कमी प्रमाणात होत आहे त्या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायतीला तशा सूचना देणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी उचंदा सरपंच शशिकला शेषराव पाटील, पुनाड सरपंच मनीषा देशमुख , शेमळदे सरपंच विनोद पाटील , मुंढळदे सरपंच प्रमिला भालेराव, पंचाने मेळसांगवे यासह सरपंच, उपसरपंच ,ग्रामसेवक यांचेसह राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु डी पाटील,माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, उपसरपंच किरण तायडे शांताराम सावडे, दिलीप पाटील, जगन्नाथ पाटील, साहेबराव पाटील जितेंद्र पाटील, दीपक इंगळे, संदीप पाटील, योगेश पाटील यांची उपस्थिती होती .