भुसावळ तालुक्यातील खडका येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खडका येथे दोन बंद घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत ६४ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील खडका येथे आदित्य संतोष चौधरी हा तरूण वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी रमेश मिठाराम सावकारे हे देखील राहतात. ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान दोघांचे घर बंद होते. दोन्ही घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकुण ६४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले.
याप्रकरणी रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार श्यामकुमार मोरे हे करीत आहे.