रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- येथील एका ग्रामसेविकेने संघटनेचे अध्यक्ष व सचिवाविरुद्ध धक्काबुक्की केल्याची फिर्याद दिल्याने रावेर पंचायत समितीच्या कारभाराचा वाद चव्हाट्यावर येऊन चर्चेचा विषय ठरला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन आदर्श ग्रामसेवकचा प्रस्ताव तयार करून पाठवला जातो. परंतु रावेर तालुक्यात विस्तार अधिकारी यांनी संघटनेच्या जवळच्या व्यक्तींच्या नावे पाठविल्याचे समजाताच आदर्श ग्रामसेवकचे अर्जदार एका महिलेने कोणती नावे जिल्हा परिषदेला पाठवली आहे याबाबत सविस्तर माहीती अधिकारात मागणी केली होती. गेल्या चार पाच दिवसापासून माहीती घ्यायला रावेर पंचायत समितीच्या चकरा मारीत होत्या. विस्तार अधिकारी प्रविण शिंदे माहिती देत नव्हते. बलवाडी येथिल आदर्श ग्रामसेवकाचे दुसरे अर्जदार ग्रामसेवकदेखील बसुन होते.
काही वेळातच या ठिकाणी ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल रमेश लोखंडे व सचिव अतुल जगन्नाथ पाटील यांनी अर्जाच्या कारणावरून महिला ग्रामसेविका यांच्या अंगावर धावत जाऊन धक्का बुक्की केली. तुझा शहाणपणा आम्ही चालु देणार नाही, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार तुझा अधिकार नाही . तुला आम्ही पाहून घेऊ अशी दमदाटी केल्याचे ग्रामसेवकाच्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास रावेर पोलीस करीत आहे .