जळगावातील सत्यम पार्क येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- रेल्वेरुळाजवळ शौचास गेलेला असताना तरुणाला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, १० डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास सत्यम पार्कजवळील रेल्वे मालधक्क्याजवळ घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय नवल पवार (२४, रा. सत्यम पार्क, जळगाव) असे या मयत तरुणाचे नाव आहे. विजय पवार हा तरुण बांधकामाच्या ठिकाणी टाईल्सचे काम करतो. रविवारी सकाळी तो शौचासाठी रेल्वे मालधक्काजवळील रेल्वेरुळाजवळ गेला. त्यावेळी डाऊन रेल्वे मार्गवरील रेल्वे खंबा क्रमांक ३०३/३६ जवळ त्याला एका धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहेत.