वेशभूषा बदलून सभेत करायचे गुन्हेगारी
भुसावळ (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी खान्देशच्या दौ-यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात शिरून गर्दी दिसताच चोऱ्या करणाऱ्या मालेगावातील कुविख्यात गैंगला भुसावळ तालुका पोलिसांनी अत्यंत सतर्कता बाळगून बेड्या ठोकल्या आहेत.
या अट्टल गुन्हेगारांनी त्यांचे वाहन मनोज-जरांगेसोबत चालणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात टाकल्याने कुणालाही या टोळीचा संशय आला नाही. कु-हेपानाचे गावात झालेल्या जबरी लूटनंतर पोलिसांना धागेदोरे गवसले अन् पारोळ्यातील नाकाबंदीत कुविख्यात टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. संशयित आरोपींमध्ये अबूबकर कबुतर मोहम्मद उस्मान (मालदा शिवार, मालेगाव), नदीम अख्तर अहमद (आझादनगर, मालेगाव), अबरार अहमद मोहम्मद रऊफ (गुरुवारपेठ, मालेगाव), हमीद अली मोहम्मद उमर (रोशनबाद, मालेगाव), बखद दाऊद हवा अब्दुल रहेमान (अकस्त कॉलनीजवळ, मालेगाव) यांचा समावेश आहे.
जामनेर येथून भुसावळकडे येत असलेले मनोज जरांगे-पाटील यांचे कु-हेपानाचे गावात सोमवार, ४ रोजी दुपारी १२.३० वाता मराठा बांधवांनी स्वागत केले. यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत राजू रूपचंद चौधरी (५३, कु-हेपानाचे, ता. भुसावळ) यांच्या खिशातून पाकिट चोरी होत असताना चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी वळून पाहिल्यानंतर पाच संशयित त्यांच्यामागे गराडा घालून उभे होते व त्यातील दोघे बळजबरीने पाकिट काढत असताना चौधरी यांनी त्यास विरोध करताच दोघांनी त्यांचे हात धरले तर अन्य तिघांनी त्यांच्या खिशातून बळजबरीने पाकिट काढून घेतले.
या पाकिटात १५ हजार ५०० रुपयांची रोकड होती. आरोपींनी तक्रारदाराला पोलिसा तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली मात्र त्यांनी न डगमगता भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे दीपक जाधव यांना प्रकार सांगितला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजद्वारे एक संशयिताची छबी निष्पन्न झाली. संशयित हे एका कारने पसार झाल्याची कळताच नशिराबादसह एरंडोल व पारोळा येथे नाकाबंदी लावण्यात आली व पारोळ्यात त्यांना पकडण्यात यश आले आहे.