जळगाव ( प्रतिनिधी) :- नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणा मार्फत हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टिन, मिठाईची दुकाने, बेकरी, चिकन/मटन शॉपकरिता स्वच्छता मानांकन ही ऐच्छिक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या आस्थापनांनी १३ डिसेंबर २०२३ अर्ज करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सं.कृ.कांबळे यांनी केले आहे.
स्वच्छता मानांकन हे स्वमूल्यांकन व त्रयस्थ पक्षाच्या ऑडिटद्वारे प्रमाणित करण्यात येते. या योजनेंतर्गत अन्न व व्यावसायिकांना आस्थापनेमध्ये अन्न सुरक्षा विषयक करण्यात येत असलेल्या उपाययोजना व त्याचे पालन याबाबत ग्राहकांचा विश्वास प्राप्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे ग्राहकांना उच्च मानांकित प्रमाणपत्र प्राप्त आस्थापनेमध्ये अन्न सुरक्षा विषयक नियमांचे पालन होत असल्याचे हमी मिळते. हे प्रमाणपत्र अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत देण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शासकीय, निमशासकीय व खाजगी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टिन, मिठाईचे दुकाने, बेकरी, चिकन/ मटन शॉप इत्यादी अन्न आस्थापनांनी या योजनेमध्ये सहभाग घेता येणार आहे. जिल्ह्यात १२५ आस्थापनांचे स्वच्छता मानांकन करण्यात येणार आहे. तरी पात्र अन्न आस्थापनांनी जिल्हा कार्यक्षेत्रातील सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, पहिला मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जळगाव येथे अर्ज करता येणार आहे. पात्र संस्थांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर स्वच्छता मानांकन करण्यात येणार आहे.