मोबाईलवरूनही नोंदणी शक्य
जळगाव (प्रतिनिधी) :- लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरुण-तरुणींना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनाही नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी ९ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे.
राज्यात आता एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. त्यासाठी १ जानेवारी २०२४ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बीएलओंनी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर जाऊनही मतदार नोंदणीचे काम केले आहे. आता ज्या तरुण-तरुणींना १ जानेवारी २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांनाही मतदार नोंदणीत सहभागी होता येणार आहे. तालुक्यातील तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत किंवा बीएलओंकडे त्यांना अर्ज देता येईल. त्याशिवाय स्वत:च्या मोबाईलवरून किंवा ऑनलाइन केंद्रांवरूनही मतदार नोंदणी शक्य आहे.