खासदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
चोपडा (प्रतिनिधी) :- अंकलेश्वर – ब-हाणपूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बुधगाव ता. चोपडा येथील रहिवासी उर्वेश साळुंखे यांनी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या डबक्यात बसून अंघोळ करून अनोखे आंदोलन केले. साळुंखे मंगळवारी ता. २८ सकाळी पावणेबारा ते दुपारी तीनपर्यंत डबक्यात बसून होते. अखेर साडेतीन तासांनंतर खासदार रक्षा खडसे आल्या व त्यांनी रस्त्याचे काम लवकर सुरू होईल, असे आश्वासन त्यांना दिल्यावर आंदोलन सोडविण्यात आले.
अंकलेश्वर-ब-हाणपूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. या रस्त्याची दुरवस्था कित्येक महिन्यांपासून आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. या वेळी आंदोलनाला असंख्य नागरिकांनी पाठिंबा दर्शविला होता.