कोरोना उपचारांसाठी डॉक्टरांसह कर्मचार्यांच्या दैनंदिन नेमणुकांसाठी मार्गदर्शक सूचना
जळगाव – ( प्रतिनिधी) – कोरोना विषाणुग्रस्त रूग्णांवर उपचार करताना सरकारी रूग्णालयांमधील डॉक्टर्स, नर्सेस, शिपाई व अन्य सहाय्यक कर्मचार्यांच्या नेमणुका कशा असाव्यात आणि या सर्वांच्या ड्युटीच्या कालावधीत त्यांच्या जेवण व वास्तव्याची सोय रूग्णालयांच्या आवारात किंवा जवळपास करावी , लगेच नेहमीसारखे त्यांनी घरी जाऊ नये , अशा आशयाच्या मागदर्शक सूचना सार्वजनिक आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जारी केल्या आहेत. तरीही जळगावातील सरकारी कोरोना रूग्णालयातील अनागोंदीमुळे अद्यापही डॉक्टर्स कामावर यायला तयार नाहीत हा मुद्दा कालपासून जळगावकरांची झोप उडवतो आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा कोविड रूग्णालयातील डॉक्टरांच्या नेमणुकांबद्दल सावळागोंधळ सुरू आहे. एक प्रकारे रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचे हे उद्योग कुणाच्या आशीर्वादाने किंवा दुर्लक्षामुळे सुरू आहेत?, हा नवाच मुद्दा समोर आला आहे. अत्यंत आणिबाणीच्या या काळात स्वतंत्रपणे अशा गोंधळाची चौकशी करण्याचे बळ व वेळ आरोग्य यंत्रणेकडे असेल का ?, याचा विचार केला व जिल्ह्यातील रूग्णसंख्यावाढीचा वेग लक्षात घेतला तर राज्यात जळगाव जिल्हा चीनमधले वूहान ठरू नये , असे म्हणत देवाचा धावा करण्याशिवाय सामान्य माणूस काहीच करू शकणार नाही.
जिल्हा कोविड रूग्णालये, कोविड आरोग्य केंद्रे व उपचार केंद्रांवर मनुष्यबळाचे नियोजन करताना सर्वांची सुरक्षा व सर्वांचा पूर्ण क्षमतेने वापर महत्वाचा आहे अशी सरकारची भूमिका आहे. अधिकारी व कर्मचार्यांची ड्युटी चक्राकार पध्दतीने लावावी, 21 दिवसांच्या या चक्रात पहिले सात दिवस कोविड रूग्णालये, कोविड आरोग्य केंद्रे व उपचार केंद्रांवर , त्यानंतरच्या सात दिवसांत सुटी व पुढच्या सात दिवसांत कोविड प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी ड्युटी लावावी. कोविड ड्युटीच्या कालावधीत त्यांच्या जेवण व वास्तव्याची सोय रूग्णालयांच्या आवारात किंवा जवळपास करावी , लगेच नेहमीसारखे त्यांनी घरी जाऊ नये. कोविड रूग्णालयांमध्ये औषधनिर्माता ( भीषकतज्ज्ञ), बधीरीकरणतज्ज्ञ, सोनोलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन यांच्या सेवा अत्यावश्यक असल्याने त्यांनाही नेमले जावे. सर्व तज्ज्ञांचे तीन चमू तयार करून अतिदक्षता विभागात सहा तासांच्या ड्युट्या लावाव्या . अन्य तज्ज्ञांच्या ऑन कॉल सेवा घेण्यात याव्यात. आयसोलेशन कक्षात एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक 8 तासांसाठी करावी. परिचर, कक्षसेवक, वॉर्डबॉय व स्टाफ नर्सची ड्युटी अतिदक्षता विभागात 6 व आयसोलेशन कक्ष आणि रूग्णालयात 8 तासांची असावी . या सर्वाची ड्युटी 21 दिवसांच्या चक्राकार पध्दतीने लावावी. सर्व अधिकारी व कर्मचार्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या गोळ्या देण्यात याव्यात. या ड्युटीच्या काळात अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र जेवण करणे किंवा एकत्र बसून रेकॉर्ड पूर्ण करणे असे प्रकार करून नयेत. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना सेवेत घेतल्यास त्यांची दुर्धर आजारांची तपासणी करून घ्यावी , त्यांना अतिदक्षता विभागात ड्युटी देऊ नये, असे सरकारने स्पष्ट केले आहे.