जळगाव तालुक्यातील वावडदा येथील घटना उघड
एलसीबी पोलिसांची यशस्वी कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वावडदा शिवारातील शेतशिवारात रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर, रोटर हिटरची चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) पोलिसांनी यशस्वी तपास करीत याप्रकरणी त्याच शेतातील संशयित सालदारासह त्याच्या शालकाला अटक केली आहे. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज यावरून पोलिसांनी दोघांना मध्यप्रदेशातून जेरबंद केले आहे. यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी तपासाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
बिलवाडी येथील रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे तालुक्यातील वावडदा ते म्हसावद दरम्यान वावडदा शिवारात शेत आहे. अज्ञात चोरट्यांनी शेतामध्ये जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी केला होता. यामध्ये रखवाली करणाऱ्या पांडुरंग पंडित पाटील (वय ५२, रा. बिलवाडी) या रखवालदाराचा डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घूण खून केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले होते. तसेच, ट्रॅक्टर व रोटर हिटर चोरून नेले होते. याबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात झाला होता.
अशी उघड झाली घटना
उपविभागीय अधिकारी ऋषीकेश रावले यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना आदेश दिले होते. त्यावरून किसन नजन पाटील यांनी एपीआय निलेश राजपूत, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदिप सावळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी अश्यांचे पथक तयार केले होते. पथकाने घटनास्थळी मिळालेले पुरावे, मोबाईल लोकेशन, गोपनीय माहिती तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मालक राजेंद्र पाटील, रा. बिलवाडी यांचे कडील सालदार पवन बहाधीर बारेला (वय ३०, रा. वाघाड जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याच्यावर संशय बळावला.
मध्यप्रदेशातून केली अटक
शेतमालकास विचारपुस करता मालकाने पवन बारेला हा त्याचे कुटुंब व शालकासह त्याचे सासरवाडी सालीकला (सालीतांडा ता.राजापुर जि.बडवानी, मप्र) येथे गेल्याचे समजले. पथकाने त्याच्या गावी जाऊन त्याला शोधले. पवन बारेला व त्याचे सोबत १ इसम मिळून आल्याने त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पवन बहाधीर बारेला (वय ३०, वाघाड ता.राजापूर जि.बडवणी) व वाघरसिंग शोभाराम बारेला (वय २४, रा. सालीफल (सालीतांडा) वा.राजापुर वडवणी म.प्र.) अशा दोघांना अटक करण्यात आली.
संशयित आरोपींनी असा केला खून
पवन बारेला याला वावडदा शिवारातील घटनेबाबत विचारले असता, त्याने घटनेची कबुली दिली. मी व माझा शालक अश्यांनी शेतमालकाचे ट्रॅक्टर चोरी करण्याचे ठरवले होते. मध्यप्रदेशातून बिलवाडी येथे येवून मालकाचे खळयातून ट्रैक्टर चोरी करीत असतांना तिथे झोपलेला रखवालदार पांडुरंग पंडीत पाटील याने त्याला विरोध केला. त्यावेळी ट्रॅक्टरसाठी वापरण्यात येणारी लोखंडी वस्तूने रखवालदार पांडुरंग पाटील याचे छातीत व डोक्यात मारुन त्याचा खून दोघांनी केला. तेथून ट्रॅक्टर घेवून निघून गेला. परंतु रस्त्यात ट्रॅक्टर बंद पडल्याने ते तिथेच सोडून मोटार सायकलने पुन्हा सासरी सालीतांडा येथे निघून आले. त्यामुळे एलसीबीने दोघांना अटक करण्यात आली. संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.