एरंडोल शहरातील दुर्दैवी घटना
एरंडोल (प्रतिनिधी) :- शहरातील हिमालय पेट्रोलपंपमागील परिसरात नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी खेळत असताना ९ वर्षीय बालकाचा छातीत आसारी घुसून धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १३ रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिक माहिती घेत आहे.
विशाल रविंद्र गायकवाड (वय ९, रा. हिमालय पेट्रोल पंपामागे, एरंडोल) असे मयत बालकाचे नाव आहे. तो आई, वडील, लहान भाऊ-बहीण यांच्यासह राहतो. हातमजुरी करून त्याचा परिवार उदरनिर्वाह करतात. एरंडोल नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु आहे. तेथे काही आसाऱ्या उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवलेल्या होत्या. सोमवारी विशाल त्याच्या मित्रांसह तेथे खेळत असताना अचानक तो पडला आणि एक आसारी त्याच्या छातीत घुसली. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत त्याला खाजगी रुग्णालयात उपचाराला नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते. हि घटना ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे झाली आहे. दोषींवर नगरपालिकेने कारवाई केली पाहिजे अशी माहिती यावेळी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी दिली.