शिंदे गट, भाजप, अजित पवार गट यांची सर्वाधिक सरशी
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. तर त्यानंतर भाजप व अजित पवार गटाने बाजी मिळविली आहे. चाळीसगाव, अमळनेर, जामनेर, जळगाव ग्रामीण, पाचोरा, मुक्ताईनगर येथे विधानसभेच्या स्थानिक आमदारांनी आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसून आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी ७७. ७३ टक्के मतदान झाले. तर ३१ पोट निवडणूकांसाठी ७३.०२ टक्के मतदान झाले. निवडणूक निकालाची मतमोजणी आज सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी पार पडली. जिल्ह्यात शिंदे गट ६३, राष्ट्रवादी ११, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २२, उद्धव ठाकरे शिवसेना ३, काँग्रेस ४, प्रहार १, अपक्ष १६६ जागा असा निकाल लागला. जिल्ह्यातील अमळनेर, जामनेर व जळगाव ग्रामीण या मतदार संघातील नामदारांनी आपापल्या गटात आपापले वर्चस्व कायम ठेवलेले आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या अमळनेरमध्ये १४ पैकी ११ अजित पवार गटाच्या ग्रामपंचायती तर मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये १७ पैकी १६ जागा भाजपच्या तर जळगाव ग्रामीणमध्ये ३२ पैकी २८ शिंदे गट असे वर्चस्व राखले आहे.
सार्वत्रिक निवडणुकीत १४७ सरपंच व १०५३ सदस्य पदासाठी प्रत्यक्ष मतदान झाले. यापैकी १५ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या. यासाठी ५६६ मतदान केंद्रांवर ७७. ७३ टक्के मतदान झाले. यामध्ये २ लाख ४८ हजार ५७० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. पोट निवडणुकीमध्ये ७९ ग्रामपंचायतीच्या जागांसाठी निवडणूक होत्या. प्रत्यक्षात ३१ जागांसाठी मतदान झाले. यात दोन सरपंच व सदस्य पदासाठी ५१ जागांसाठी ४४ मतदान केंद्रांवर मतदान ७३. ०२ टक्के मतदान झाले.
जळगाव तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सावित्रिक निवडणूका व दोन ग्रामपंचायतींची पोट निवडणूक रविवारी पार पडली. आज झालेल्या मतमोजणीत १७ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला. जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रागंणात ६ टेबल लावण्यात आले होते. १२ मतमोजणी अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नामदेव पाटील, निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी, नायब तहसीलदार राहुल वाघ यांनी कामकाज पाहिले. उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांनी मतमोजणीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
विटनेर निवडणुकीत सर्वसाधारण स्त्री मतदार संघातून सरपंच नेहा ललित साठे, तर सदस्य म्हणून नामाप्र मधून मनीषा शांताराम पाटील, सर्वसाधारण मतदार संघातून गोकुळ दला राठोड, सर्वसाधारण स्त्री मतदार संघातून छाया गुंजाळ, सर्वसाधारण मतदार संघातून सागर विजयसिंग परदेशी, अनु. जाती. स्त्री मतदार संघातून विजूबाई जुलाल निकम बिनविरोध व अनु. जाती.जमाती स्त्री मतदार संघातून तुळसाबाई रामदास भिल बिनविरोध , तर सर्वसाधारण मतदार संघातून मालतीबाई परदेशी, सर्वसाधारण स्त्री मतदार संघातून सुवर्णा भूषण पाटील, सर्वसाधारण मतदार संघातून सागर ईश्वर दिवाने, नामाप्र स्त्री मतदार संघातून अर्चना दिनेश भगत, सर्वसाधारण स्त्री मतदार संघातून अर्चना संजय जाधव हे सदस्य निवडून आलेले आहेत.
लोणवाडी खुर्द – ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच अर्चना बळीराम धाडी, तर सदस्य संदीप भास्कर पवार, मंगलाबाई रमेश पाटील, आशाबाई रमेश भिल, गीता बाळू धाडी, वत्सलाबाई मोरसिंग धाडी, चरण राजू धाडी, साईदास राठोड, श्रावण सदू राठोड, वैजान्ताबाई रोहिदास चव्हाण हे सदस्य निवडून आलेले आहेत. खेडी खु ग्रामपंचायत पोट निवडणुकीत आकाश भीमराव सोनवणे, अतुल दिनकर सपकाळे, सोनाली देवेन्द्र चौधरी, देवेंद्र भास्कर पाटील, उषा नारायण सोनवणे, वंदना मछिंद्र सपकाळे, प्रमोद आनंदा सोनवणे, आरती संतोष सोनवणे, मोहिनी तुषार सोनवणे हे विजयी झाले.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तालुक्यातील बेलसवाडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या मंदाकिनी कोळी, वडवे ग्रामपंचायतवर शिंदे गटाचे शिवराम कोळी, चिखली ग्रामपंचायत वर शिंदे गटाचे वैभव पाटील सरपंचपदी विराजमान झाले. तर पिंपरी नांदू ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसे समर्थक प्रतिभा अशोक पाटील सरपंच पदी विराजमान झाले आहेत.
अमळनेर तालुक्यात १४ ग्रामपंचायतवर अजित पवार गटाचा झेंडा
अमळनेर तालुक्यात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे पाहायला मिळाले. अमळनेर तालुक्यातील १७ पैकी १४ ग्रामपंचायतवर अजित पवार गटाचा झेंडा फडकला असून दोन ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे. तसेच शरद पवार गटाला मात्र एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान विजयानंतर मंत्री अनिल पाटील यांच्या समवेत विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला आहे.
प्रहार पक्षाचा जिल्ह्यातील पहिला सरपंच
जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील थेरोडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खाते उघडले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे सोशल मीडियाचे जिल्हाप्रमुख शुभम पाटील यांनी जोरदार मुसंडी मारत लोकनियुक्त सरपंचपदी विजयी झाले आहे. एकूण मतदान ८५० मतदाना पैकी शुभम पाटील यांना ४५० झाले असून त्यांनी किरण गुलाबराव पाटील, प्रभाकर डिगंबर पाटील यांना पराभूत करत विजय संपादन केला आहे.
चाळीसगावात आ. मंगेश चव्हाणांचे वर्चस्व
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरु आहे. ११ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून बिनविरोध झालेली १ ग्रामपंचायत सह १२ पैकी १२ ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासह शिवसेना उबाठा गट व काँग्रेस पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी गटनेते शशिकांत साळुंखे यांच्या खेडगाव गावातील पॅनलचा धुव्वा उडवत भाजपा पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार उषाबाई मरसाळे विजयी झाले आहेत तर सदस्य पदांवर देखील ११ पैकी ९ उमेदवार भाजपा पुरस्कृत पॅनलचे निवडून आल्याने भाजपचे निर्विवाद वर्चस्व खेडगाव ग्रामपंचायतीवर सिद्ध झाल आहे.