चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बहाळ येथे किरकोळ कारणावरून एका संशयित आरोपीने दारूच्या नशेत धुंद होऊन गॅरेजवरील काम करणाऱ्या तरुणाला हवेत उचलून जमिनीवर आपटत त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश संतोष बोरसे कुंभार (वय २४) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो बहाळ गावामध्ये आई, वडील, बहिण यांच्यासह राहतो. तसेच शिवशक्ती ऑटो गॅरेज हे बस स्टॉपवर त्याचे दुकान असून तेथे वाहन दुरुस्तीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह तो करीत होता. शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी त्याने संशयित आरोपी ज्ञानेश्वर निंबा मासरे याची दुचाकी दुरुस्त करून दिली होती. मात्र दुचाकी परत खराब झाली.
त्यामुळे ज्ञानेश्वर मासरे याने शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मद्यधुंद होऊन त्याची दुचाकी परत शिवशक्ती गॅरेज मध्ये महेश बोरसे यांच्याकडे आणली. त्यावेळेला महेश बोरसे हा दुसऱ्या व्यक्तीची गाडी दुरुस्त करीत होता. त्याने संशयित आरोपी ज्ञानेश्वर मासरे याला, थोडं थांबा, ही गाडी झाल्यावर तुमची गाडी दुरुस्त करून देतो, असे सांगितले. मात्र त्याचा राग आल्यामुळे त्याने महेश बोरसे याला उचलले आणि जमिनीवर जोरात आपटले. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.
तिथे उपस्थित त्याच्या वडिलांनी याचा जाब विचारला असता त्यांनाही संशयित आरोपीने शिवीगाळ केली. आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी महेश बोरसे याला रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. मेहुणबारे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. तसेच रुग्णालयात जाऊन कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. संशयित आरोपी ज्ञानेश्वर मासरे फरार झाला होता. पोलिसांनी तपास चक्र फिरवून रात्रीच त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत महेश बोरसे याचे पिता संतोष बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून तपास सपोनी विष्णू आव्हाड करीत आहेत.
गावात बोकाळले दारू विक्रीची दुकाने, ग्रामस्थ हैराण
बहाळ गावामध्ये दारू विक्रीची दुकाने बोकाळली असून ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ही दारू विक्रीची दुकाने हटवावी याकरिता ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली होती. त्याचबरोबर तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील या प्रश्नी आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र दारू विक्रीचे दुकाने काही बंद झालेले नाही. आज या दारू विक्रीच्या दुकानांमुळेच तरुण महेश बोरसे याचा खून झाला अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.