ऑर्थोपेडिक्स परिषदेतील यश
जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र आर्थोपेडिक असोसिएशनची वार्षिक परिषद नुकतीच गांधीतीर्थ जळगाव येथे संपन्न झाली. या परिषदेत कार्यशाळा, सायंटिफिक पेपर्स, पोस्टर्स, लेक्चर्सच्या माध्यमातून ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टरांनी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. परिषदेत चेन्नई येथील नामवंत डॉ. एल.प्रकाश यांनी कार्यशाळेत टीपीटीएस हे नवीन तंत्रज्ञान वापरून शस्त्रक्रिया कशी करावी? त्याचा डॉक्टरांना व रुग्णांना कसा फायदा होईल याविषयी मार्गदर्शन केले होते.
परिषदेनंतर अवघ्या चारच दिवसात जळगावातील अस्थिरोग तज्ञ डॉ. जितेंद्र कोल्हे व डॉ. विनोद जैन या दोघांनी हे नवीन तंत्रज्ञान वापरून जिल्हापेठ पोलीस स्टेशन शेजारील निर्मलसेवा एक्सीडेंट हॉस्पिटल येथे एका रुग्णाच्या खांद्याची कोणतीही चिरफाड न करता यशस्वी शस्त्रक्रिया केली. दुसऱ्याच दिवशी रुग्ण हालचाल करू लागला. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला डॉ.अतुल पाटील यांनी भूल दिली. या नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर शिकण्यासाठी दहा अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.
या वार्षिक वैद्यकीय परिषदेत आम्हाला नवनवीन तंत्रज्ञान जेष्ठ तज्ज्ञांकडून शिकायला मिळते, नॉलेज अपडेट होत असते,त्यामुळे आम्ही रुग्णांच्या वेदना कमी
करू शकतो याचे समाधान आहे अशी प्रतिक्रिया डॉ. जितेंद्र कोल्हे यांनी व्यक्त केली.